Ad will apear here
Next
अंजली इला मेननची मुरानो चित्रे...
अंजली इला मेनन

चित्राच्या माध्यमाला मर्यादा नसतातच. अगदी काच या माध्यमातही चित्रे असतात. ही चित्रे ‘काचचित्रे’ या नावाने ओळखली जात असली, तरी फार थोड्या चित्रकारांनी हे माध्यम आपल्या अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून सजगपणे निवडले आहे. २००३मध्ये अंजली इला मेनन या चित्रकर्तीने काचेची ‘चित्रे’ केली होती. ‘स्मरणचित्रे’ सदरात आज त्या वेगळ्या चित्रांच्या प्रदर्शनाबद्दल...
............
चित्राच्या माध्यमाला मर्यादा नसतातच. अगदी काच या माध्यमातही चित्रे असतात. ही चित्रे ‘काचचित्रे’ या नावाने ओळखली जात असली, तरी फार थोड्या चित्रकारांनी हे माध्यम आपल्या अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून सजगपणे निवडले आहे. २००३मध्ये अंजली इला मेनन या चित्रकर्तीने काचेची ‘चित्रे’ केली होती. त्याचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत भरले होते. येथे ‘चित्र’ हा शब्द नेहमीपेक्षा वेगळ्या अर्थाने वापरला आहे. मराठीमध्ये चित्रे हा शब्द लहान शिल्पांना वापरतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिवाळीत किल्ले करतात, त्यावर मावळे, प्राणी-पक्षी यांची चित्रे ठेवतात. त्यांना शिल्पे म्हणत नाहीत. अंजली इला मेनन यांची काचेची शिल्पेही शिल्प न म्हणता मराठीत चित्र म्हणण्यासारखी होती. 

यासाठी काही काळ अंजली इटलीमध्ये वास्तव्याला होत्या. व्हेनिस जवळच्या मुरानो गावात त्यांनी ही शिल्पे तयार केली. त्या गावातील कारागिरांना मिस्त्री किंवा मेस्त्री असे म्हणतात. स्थानिक शब्द मेस्त्री किंवा मुरानो. हे गाव इटलीतील काचकामासाठी सुप्रसिद्ध आहे. या परंपरेच्या वारसांकडून त्यांनी ही शिल्पे करवली. अंतोनिओ दा  रोस या काचकाम करणाऱ्या सुप्रसिद्ध शिल्पकाराने आणि अंजली यांनी एकत्रित केलेली ही चित्रे. जवळजवळ अडीच वर्षे काम करून एकूण ८० शिल्पे त्यांनी तयार केली. 



या काचचित्रांचे विषय भारतीय परंपरेतील होते. यातील सर्वांत लक्षात राहिलेले चित्र म्हणजे बाळकृष्णाचे. पाठीवर पडून पायाचा अंगठा तोंडात घालणारे हे बालक. पारदर्शक शिल्पाकृती मोठ्या आकर्षक वाटत होत्या. माझ्याही पाहण्यात आलेला हा प्रयोग तेव्हाच्या अग्रगण्य स्त्री कलावंताने सर्वप्रथम केला होता. ही शिल्पे आकर्षक होती. या पूर्वी देवघरात आपल्यापैकी अनेकांनी रांगणारा बाळकृष्ण पाहिला असेल. तशीच ही शिल्पचित्रे होती. पारदर्शक शिल्पे पाहणे हा अनुभव नवा होता. सर्वत्र ही शिल्पे मांडलेली होती. गणेश, शिवलिंग, बाळकृष्ण, शाळीग्राम या परिचित आकारांना त्यापूर्वी पारदर्शक माध्यमात पाहण्याची संधी फार क्वचित मिळाली होती. प्रतापगड या ऐतिहासिक ठिकाणी स्फटिकाचे एक पारदर्शक शिवलिंग आहे. माझे बालपण तेथेच गेल्याने साहजिकच त्या शिवलिंगाची आठवण झाली. पारदर्शक शिल्प-चित्र पाहण्याचा तो एकमेव अनुभव त्यापूर्वी होता. 

नंतर पुण्यात आल्यावर घोरपडी पेठेत एक कारागीर काचेची चित्रे करीत असे, ते पाहण्यात आले होते. काचेच्या दोन दांड्या एकमेकांना जोडून, फिरवून, लांबवून नाना तऱ्हेचे, रंगाचे पक्षी ते करीत असत. त्यांची काही प्रात्यक्षिके पाहिली होती. पुण्यात मोरे म्हणून एक गृहस्थही या प्रकारचे काम करीत असत. भोरलाही काकडे नावाचे गृहस्थ असे कारागिरीचे काम करतात. पुण्यात पूर्वी काचेच्या बांगड्या करीत असत. परंतु त्यासाठीचा कच्चा माल गुजरातमधून कपडेवंज गावातून येत असे. म्हणजे काचेच्या त्रिमिती शिल्पांची परंपरा पुण्यातही नव्हती. 


साधारणत: १९५९च्या सुमारास भारत सरकारच्या वतीने देवघेव स्वरूपात वेगवेगळ्या देशांतील कौशल्य शिकवणे-शिकणे कार्यक्रमांतर्गत पुण्यात शेतकी कॉलेजला जपानी कारागीर आले होते. त्यांच्याकडून ही पारदर्शकता असलेली कौशल्ये इथल्या लोकांनी शिकून घेतली आणि त्या प्रकारे लहान, कौशल्यपूर्ण शिल्पे-चित्रे तयार करण्याची नवी पद्धत पुण्यात रुजली. आजही अशा प्रकारे कामकाज करणारे कारागीर पुण्यात आहेत. तेव्हा सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरांत शोकेसमध्ये लावलेली मोर, बदक, हंस इत्यादी प्राण्यांची काचेची शिल्पे पाहिलेली होती. इतक्या पार्श्वभूमीवर अंजली इला मेनन यांची शिल्पे विशेष आकर्षक वाटत होती. पारदर्शकतेबरोबरच एखादा रंग आतून वापरणे इत्यादी प्रयोग होते. उदाहरणार्थ, बाळकृष्णाच्या शिल्पामध्ये गडद निळा आणि निळ्याच्या अनंत छटा. पानावर पहुडलेले बाळ, एक पाय वर करून निवांत लीला करणार... 



काही शिल्पे मजेशीर वाटतात. उदाहरणार्थ, बाळकृष्ण हा देव... म्हणून त्याला मुकुट. हा मुकुट इटालियन कलावंताने केलेला. म्हणजे मुकुट हा थेट ख्रिस्तकलेतील मुकुटाप्रमाणे अगदी इटालियन स्टाइलचा. या मिश्रणात किंवा या संकरित प्रतिमांमध्ये एक प्रकारची गंमत असते. दृश्यकला पाहताना अशी स्थळे तुम्हाला वेगळाच अनुभव देऊन जातात. असेच निळ्याच्या जोडीने पिवळसर बाळकृष्णाचे चित्र-शिल्प... हातात लाडू घेतलेला रांगणारा बाळकृष्ण. नळ्यांच्या साह्याने केलेला असल्याने त्यातही मजा होती पाहायला. येथे मुकुट थेट आपल्या सरदाजींच्या पोरांच्या बुचड्याप्रमाणे होता.



गणपती तर काय? कोणत्याही माध्यमात आणि स्वरूपात फिट करता येणारा आकार. काच-चित्रात अंजली इला मेनन आणि सहकाऱ्यांनी विविध रूपांत गणेश साकारले होते. अमूर्त रूपात वाटावेत असे शिवलिंगाचे आकार होते. थेट नर्मदेतील गोटे असतात तसे लांबुळके. त्यावर ओंकार साकारलेले. बहुरंगी परंतु पारदर्शक स्वरूपात. 

एकुणात हा प्रयोग नवा होता. किमान समकालीन भारतीय कलेत तरी... त्यानंतर त्यांनीही बहुधा हे माध्यम फारसे वापरलेले आढळले नाही. 



जेव्हा ‘काचचित्रे’ ही संज्ञा वापरली जाते, तेव्हा काचेवर काढलेली चित्रे असे मानण्याची पद्धत आहे, जसे के. जी. सुब्रह्मण्यमसारखे कलावंत काचेच्या मागील बाजूने चित्रे काढतात. खरे पाहिले तर अंजली इला मेनन आणि अंतोनिओ दा रोस यांच्या या सहयोगी प्रयोग-प्रकल्पाकडे आपण जगप्रसिद्ध आर्ट-क्राफ्ट चळवळीचा भाग म्हणून पाहू शकतो. कलावंताने स्वत:ला कायम उच्च मानायचे आणि कारागिराला दुय्यम मानायचे, हे कोठे तरी थांबायला हवे, या दृष्टीने युरोपमध्ये मागच्या शतकात काही चळवळी झाल्या. आर्ट नोव्हा, बाहाउस स्कूल इत्यादी चळवळींचे मूळ या विचारात होते. इतकेच काय, पण समकालीन भारतीय कलेतील के. जी. सुब्रह्मण्यमसारख्या कलावंतांनीदेखील या विचारांचा स्वीकार केलेला दिसतो. 

तेव्हा अंजली इला मेननची ही काच शिल्पे-चित्रे वेगळा प्रयोग म्हणून लक्षात राहिली आहेत. वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशयोजनेमुळे आजही त्यांच्या स्मृती ताज्या वाटतात, इतक्या त्या प्रभावी होत्या. काही वेळा नव्या माध्यमाच्या शक्यता आणि मर्यादा समजायला कलावंतांनाही मर्यादा येतात. हे प्रदर्शन त्याचेच उदाहरण होय, असेही आज आणि तेव्हादेखील वाटत होते. परंतु अशा सहयोगी प्रयोगातून काही प्रमाणात दृश्यकलेला पोषण नवनीतही निर्माण होते, हेही तितकेच खरे.

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

काचकामाची फॅक्टरी
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZPABT
 लेख अभ्यासपुर्ण आणि चौफेर दृष्टी देणारा आहे. यानिमित्ताने आपल्याकडच्या ‘कलावंतां’च्या ठायी कारागिरांविषयी आदर वाढीस लागलाच तर त्यांचाही ‘विकास’ होईल ... होईल का ?
 माहिती व विश्लेषण दोन्ही छान व सोप्या भाषेत आहे.
" काहीवेळा नव्या माध्यमाच्या शक्यता - - - नवनीतही निर्माण होते." या शेवटच्या ४,५ ओळीत या कलाकृतीं बद्दल नेमके सार सर्वस्व आले आहे.
Similar Posts
लक्ष्मण गोरे यांची कुतुहलापोटीची सहचित्रे! लोकांना खरेच कलेबद्दल काय वाटते, कलेची गरज असते का, असे नाना प्रश्न मनात घेऊन लक्ष्मण गोरे या तरुण चित्रकाराने सहचित्रांचे प्रयोग शहरी आणि ग्रामीण भागात केले होते. त्यात सगळ्यांनी एकत्र येऊन चित्रे काढणे अभिप्रेत होते. त्यात, चित्रकार आणि चित्रकार नसलेले असे सगळे कोणत्याही भेदभावाशिवाय एकाच कॅनव्हासवर चित्र रंगवतात
राह पकड तू एक चलाचल... एकाच प्रकारचे दृश्य घटक घेऊन त्यातील सर्व शक्यतांचा धांडोळा गेल्या एक दशकाहून अधिक काळ राजाराम होले हे चित्रकार घेत आहेत. अशा शक्यता पडताळून पाहण्यासाठी खूप धीर लागतो. वारंवारिता हा डिझाइनचा प्रकार होले वापरतात. होलेंच्या एकूण कारकिर्दीकडे पाहताना हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ काव्यसंग्रहातील ‘राह
मुंबईचा ठग : दी बॉम्बे ब्युकनर एखाद्या समकालीन चित्रकाराच्या प्रगतीचा आलेख पहायचा झाल्यास अतुल डोडियांच्या चित्रांचे उदाहरण यथोचित ठरावे. नव्या पिढीसाठी अतुल डोडियांनी नवे पायंडे निर्माण केले आहेत. जुन्या प्रतिमा घेऊन त्यांना नव्या स्वरूपात दाखवतात आणि सराईत ठगाप्रमाणे त्या प्रतिमा चक्क नव्याच दिसतात. या अर्थाने ते चित्रकलेतील मुंबईचे ठग ठरावेत
तुम्हाला ‘पाहता’ येते का? खरे तर पाहण्याची सवय आपल्याला नसतेच. आपण अनेक गोष्टींवर नुसती दृष्टी टाकत असतो. नजरेत अनेक गोष्टी येतात, पण ‘पाहणे’ होत नाही. त्या प्रक्रियेची आम्हाला सवयच नाही. कला महाविद्यालयांमध्ये चित्र काढण्याची तंत्रे, विद्या आणि कौशल्ये मिळतात. पाहायला शिकवायचा विषय तेथे नाही. चित्रकार म्हणून कर्तृत्व गाजवलेल्यांना पाहता येतेच असे नाही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language